Type Here to Get Search Results !

पाऊस रुसला की आपणच निसर्गाला रुसवलं आत्मचिंतनाची वेळ ?... ..

 विकासाच्या नावाखाली निसर्गावर घाव; आता अवकाळी दुष्काळाचा फटका*                                                          विकासाच्या शर्यतीत माणसाने झाडांची कत्तल केली, नद्या-नाले बुजवले, डोंगर पोखरले आणि मोकळ्या जमिनी काँक्रीटच्या जंगलाखाली गाडल्या. निसर्गाला केवळ संसाधन समजून त्याचा सातत्याने होणारा ऱ्हास आज गंभीर पर्यावरणीय संकटाचे रूप धारण करत आहे. परिणामी ऋतूचक्र विस्कळीत होत असून पावसाचा लहरीपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.              पूर्वी ठराविक काळात आणि ठराविक 


प्रमाणात पडणारा पाऊस आता कधी उशिरा येतो, कधी अतिवृष्टी करून हाहाकार माजवतो, तर कधी दुष्काळाचे सावट निर्माण करतो. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि पर्यावरण अभ्यासक यांच्यातही या बदलांबाबत चिंता व्यक्त होत आहे. हवामान बदलाला केवळ नैसर्गिक घटना म्हणून पाहण्यापेक्षा मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. निसर्गावर विजय मिळवल्याचा दावा करणारा माणूस आजही पाणी, हवा आणि अन्नासाठी निसर्गावरच अवलंबून आहे, ही वस्तुस्थिती विसरता येणार नाही. पाऊस रुसलेला नाही, तर जखमी झालेला निसर्ग आपल्या कृतींचे परिणाम दाखवत आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन ही काळाची गरज बनली असून, अन्यथा भविष्यातील संकटे आणखी भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments