Type Here to Get Search Results !

पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबरमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे घरबसल्या हयातीचा दाखला सादर करता येणार; ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा

 पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबरमध्ये डिजिटल जीवन



जळगाव : राज्यातील तसेच जिल्ह्यातील पेन्शनधारकांसाठी केंद्र शासनाच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र (Digital Life Certificate – DLC) अभियानांतर्गत १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पेन्शनधारकांना आता बँकेत प्रत्यक्ष उपस्थित न राहता मोबाईलद्वारे चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा (Face Authentication Technology) वापर करून आपला हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. यामुळे विशेषतः वृद्ध, आजारी आणि हालचाल करण्यास अडचण असलेल्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चेहरा ओळख तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया अधिक सुलभ

या अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान. पेन्शनधारकांकडे अँड्रॉइड किंवा आयओएस (iOS) प्रणालीचा स्मार्टफोन असल्यास त्याद्वारे स्वतःच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग करून अवघ्या ६० सेकंदांत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याद्वारे चेहरा स्कॅन करून डोळ्यांची उघडझाप (Blink) करावी लागते. चेहरा पडताळणी यशस्वी झाल्यानंतर प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण होते.

मोबाईलवरून जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे?

डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शनधारकांनी सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमधील Google Play Store किंवा अधिकृत ॲप स्टोअरवरून AadhaarFaceRD आणि Jeevan Pramaan ही ॲप्स डाउनलोड करावीत. त्यानंतर पेन्शनधारकाचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांसारखी आवश्यक माहिती भरावी. मोबाईलवर प्राप्त झालेला OTP नोंदवून पेन्शनसंबंधित माहिती भरावी. यामध्ये पेन्शनधारकाचे नाव, PPO क्रमांक, पेन्शन खाते क्रमांक तसेच पेन्शन देणाऱ्या बँक किंवा संस्थेचे नाव अचूक नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर चेहरा ठेवून पडताळणी पूर्ण करावी. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर पेन्शनधारकाला SMS द्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा Pramaan ID प्राप्त होतो.

८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सुविधा

या अभियानांतर्गत ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या अतिज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा (Doorstep Banking) तसेच आवश्यकतेनुसार विशेष मदत दिली जाणार आहे. त्यामुळे वयोमानामुळे बँक किंवा संबंधित कार्यालयात जाणे शक्य नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

देशभरात विशेष शिबिरांचे आयोजन

डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातील २ हजारांपेक्षा अधिक शहरे व जिल्ह्यांमध्ये विविध बँका, ७८५ टपाल कार्यालये, रेल्वे आणि संरक्षण विभागाच्या कार्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन केले जात आहे. या शिबिरांमधून पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

पेन्शनधारकांनी अभियानाचा लाभ घ्यावा

डिजिटल जीवन प्रमाणपत्रामुळे पारंपरिक पद्धतीने बँकेत जाऊन हयातीचा दाखला सादर करण्याची आवश्यकता कमी झाली असून संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि तंत्रज्ञानाधारित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पेन्शनधारकांनी १ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आपले डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क :जिल्हा कोषागार कार्यालय, जळगावजिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव – ४२५००१दूरध्वनी : ०२५७-२२२९७१०ई-मेल : [email protected]

Post a Comment

0 Comments