राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (PF) परतावा मिळण्यात मोठ्या अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे. यासाठी बंद असलेली ऑनलाईन ‘BDS’ प्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा कार्यकारी सदस्य किशन पुंड यांनी यासंदर्भात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह मंत्रालयातील संबंधित सचिव, पुणे येथील संचालक आणि प्रादेशिक उपसंचालक यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून सेवा बजावलेले कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना PF परतावा मिळालेला नाही. ‘BDS’ ऑनलाईन प्रणाली बंद असल्यामुळे निधी परताव्याची प्रक्रिया रखडली असून, संबंधित कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर, शासनाने तात्काळ ‘BDS’ प्रणाली सुरू करून प्रलंबित PF परताव्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment
0 Comments